- गुलमोहर अपार्टमेंटचे सांडपाणी थेट मुख्य रस्त्यावर; छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळील प्रकार
- विद्यार्थी, महिलांना सांडपाण्यातून वाट काढण्याची वेळ; साथरोग पसरण्याची भीती
वसई (प्रतिनिधी) :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दिमाखात उभ्या असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पायथ्याशीच प्रशासनाच्या अनास्थेमुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वसईच्या नवजीवन वसाहतीमधील ‘गुलमोहर अपार्टमेंट’चे शौचालयाचे अशुद्ध आणि सांडपाणी थेट मुख्य रस्त्यावर सोडण्यात येत असून, फुटलेल्या चेंबरमुळे संपूर्ण परिसरात जीवघेणी दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकाराबद्दल वसाहतीमधील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जीवनवाहिनीवरच सांडपाण्याचा लोट
नवजीवन वसाहतीचा हा मुख्य रस्ता परिसराची जीवनवाहिनी मानला जातो. याच मार्गावरून रोज शेकडो शाळकरी मुले-मुली, महिला आणि वयोवृद्ध नागरिक ये-जा करतात. मात्र, सध्या त्यांना याच विषारी आणि दुर्गंधीयुक्त सांडपाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाच्या आणि संबंधित सोसायटीच्या नाकर्तेपणामुळे निष्पाप लेकरांना घाणीचे साम्राज्य तुडवावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
साथरोगांचे सावट
सतત वाहणाऱ्या या सांडपाण्यामुळे परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून, डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, कावीळ आणि त्वचारोगांसारख्या जीवघेण्या आजारांची साथ पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय, प्रवेशद्वाराकडील मुख्य रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी या भागाकडे फिरकतच नसल्याचे निदर्शनास आले असून झाडू मारणे, गटारांची स्वच्छता आणि औषध फवारणी यांसारख्या प्राथमिक गोष्टीही पूर्णपणे बंद आहेत.
स्थानिक प्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
वार्ड क्रमांक १९ (अ, ब, क, ड) मधील लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणा या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. निवडणुकांमध्ये विकासाची मोठमोठी आश्वासने देणारे नेते आता कुठे लपून बसले आहेत? असा थेट सवाल त्रस्त जनता विचारत आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या:
- त्वरित दुरुस्ती: गुलमोहर अपार्टमेंटचे फुटलेले सांडपाणी चेंबर तातडीने दुरुस्त करून गाळ उपसा करावा.
- सांडपाणी बंदी: रस्त्यावर वाहणारे सांडपाणी तात्काळ बंद करून संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण व साफसफाई करावी.
- रस्ते दुरुस्ती: छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराकडील खराब व खड्डेमय मुख्य रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात यावी.
