उपसंपादक घनश्याम आंबोकर

​मीरा भाईंदर: – शहरातील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाची नवी इमारत उद्घाटनानंतर चार वर्षे लोटूनही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने वसतिगृहाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

  • ​सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर: वसतिगृहात अधिकृत सुरक्षा रक्षकांचा अभाव असून परिसरात दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत. बाहेरील समाजकंटकांचा वावर रोखण्यासाठी तातडीने दिवसरात्र सुरक्षा रक्षक नेमण्याची व सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.
  • ​धोकादायक व्यवस्था: पार्किंग शेडचे पत्रे तुटल्यामुळे जीवितहानीची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच दीर्घकाळापासून बंद असलेली लिफ्ट आणि उघड्या अवस्थेतील विद्युत केबल्समुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
  • ​स्वच्छता आणि आरोग्य: परिसरात नियमित साफसफाई होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे, असे शिष्टमंडळाने म्हटले आहे.

​”आदिवासी विद्यार्थ्यांना लवकरात लवकर सर्व आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि सुरक्षिततेसाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा मीरा भाईंदर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती-जमाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबासाहेब खरात यांनी दिला आहे.

​ही पाहणी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या तथा नगरसेविका आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष सय्यद आफरीन मुझफ्फर हुसैन यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र खरात यांच्यासह काँग्रेसचे शिष्टमंडळ उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र विरोध दर्शवला जाईल, असा पुनरुच्चार नेत्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *