​प्रतिनिधी, राजेश जाधव

मुंबई (वांद्रे):

बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. १४१ (वांद्रे पूर्व), जयंती उत्सव कमिटी आणि आम्रपाली महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे यंदाही ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

​दिवसाची सुरुवात सकाळच्या सत्रात ध्वजारोहणाने झाली. शाखेचे उपाध्यक्ष संदेश जाधव आणि माजी अध्यक्ष रघुनाथ जाधव यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले. यानंतर बौद्धाचार्य वसंत पवार यांनी उपस्थितांना त्रिशरण, पंचशील आणि धम्मदेसना दिली.

​दिवसभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळच्या सत्रात आम्रपाली महिला मंडळाच्या वतीने स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. तसेच शालांत परीक्षेत (१० वी व १२ वी) विशेष यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.

​यानंतर शाखेचे उपाध्यक्ष संदेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली छोटेखानी प्रबोधनात्मक सभा पार पडली. या सभेमध्ये माजी अध्यक्ष रघुनाथ जाधव यांनी उपस्थितांना बौद्ध धम्माविषयी विस्तृत माहिती दिली. तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि शाखेचे उपचिटणीस राजेश जाधव यांनी “२२ प्रतिज्ञांचे महत्त्व आणि अंधश्रद्धा” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा देताना अनुयायांना २२ प्रतिज्ञा का दिल्या, याचे सामाजिक व वैचारिक महत्त्व पटवून देत समाजातील अंधश्रद्धेचे निर्मूलन करण्याचे आणि त्यापासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

​हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष भूषण मोरे, सचिव संदीप पवार, रितेश गमरे यांच्यासह इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी व आम्रपाली महिला मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेचे चिटणीस संतोष जाधव यांनी केले, तर उपस्थितांचे अनुमोदन वसंत पवार यांनी दिले. शेवटी अध्यक्षीय भाषणात संदेश जाधव यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *