oplus_3145760

(मिरा रोड | प्रतिनिधी घनश्याम आंबोकर ) मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ‘ए.एन.के. स्पा पार्लर’वर कनाकिया पोलीस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी अचानक धाड टाकत मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या हायप्रोफाइल देहव्यापाराचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी ५ पीडित महिलांची सुटका केली असून, स्पा पार्लर व्यवस्थापकासह २ ग्राहकांना जागीच ताब्यात घेतले आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मिरा रोड येथील ‘ए.एन.के. स्पा पार्लर’मध्ये मसाजच्या नावाखाली अवैध देहव्यापार चालवला जात असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली होती. या बातमीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मंगळवार, २७ जुलै रोजी दुपारी सुमारे ३.०० वाजताच्या सुमारास स्पा पार्लरवर धडक धाड टाकली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धडक मोहीम

सदरची कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) पिंगळे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत व कनाकिया पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुराडे मॅडम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली. पोलिसांच्या या अचानक झालेल्या धाडीमुळे परिसरात व अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

५ महिलांची सुटका; मॅनेजर अन् ग्राहक अटकेत

या छापेमारी दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून ५ पीडित महिलांची सुटका केली. तसेच या बेकायदेशीर व्यवसायाचा कारभार पाहणारा पार्लर व्यवस्थापक (मॅनेजर) आणि २ ग्राहकांना ताब्यात घेऊन कनाकिया पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

“गोपनीय माहितीच्या आधारे कनाकिया पोलिसांनी ही कारवाई केली असून ५ महिलांसह व्यवस्थापक व ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार (PITA) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.”राहुल चव्हाण, पोलीस उपायुक्त (DCP)

या प्रकरणी कनाकिया पोलीस ठाण्याचे पथक अधिक तपास करत असून या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि यामागे आणखी कोणाचा हात आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिक आणि स्थानिक वर्तुळातून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed