वसई-विरार (घनश्याम आंबोकर):
नालासोपारा परिसरातून उघडकीस आलेल्या बहुचर्चित मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्स तस्करी प्रकरणाचा तपास करत असताना मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ ने तेलंगणात मोठी कारवाई केली आहे. ड्रग्स तयार करण्यासाठी लागणारे प्रतिबंधित रासायनिक घटक (केमिकल पावडर) तयार करणारा तेलंगणातील एक अवैध कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून, या प्रकरणी आतापर्यंत एकूण २५ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
कारवाईची पार्श्वभूमी:
गतवर्षी २५ जून रोजी नालासोपाऱ्यातील प्रगतीनगर परिसरात पोलिसांनी कारवाई करत दोघा संशयितांना ११२ ग्रॅम एमडी ड्रग्ससह अटक केली होती. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा सखोल तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ कडे वर्ग करण्यात आला होता.
अमली पदार्थ निर्मितीचे धागेदोरे देशव्यापी:
गुन्हे शाखेने या प्रकरणात आतापर्यंत अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत यापूर्वी गुजरातच्या कच्छ आणि उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील शेतजमिनीत सुरू असलेल्या एमडी ड्रग्सच्या अवैध फॅक्टऱ्या उध्वस्त केल्या होत्या. या कारवाईत यापूर्वीच सुमारे ६९ किलोहून अधिक वजनाचा एमडी साठा व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांनी मुर्तुजा मोहम्मदभाई पत्रावाला, शुभम विनोद मोरे, सलीम इस्माईल डोला, साबीर मोहम्मद देवळेकर आणि मोहम्मद तेहरीम अब्दुल रईस सिद्दीकी या नवीन संशयितांना अटक केली.
तेलंगणातील कारखान्यावर छापा:
तपासादरम्यान, आरोपींना एमडी ड्रग्स तयार करण्यासाठी एनडीपीएस कायद्यांतर्गत नियंत्रित असलेले ‘२-ब्रोमो-४-मिथाइलप्रोपिओफेनोन’ (2-BROMO-4METHYLPROPIOPHENONE) हे रासायनिक केमिकल रमेश बाबू साके हा व्यक्ती तेलंगणातील पठनचेरु येथे अवैधपणे तयार करून पुरवत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार, गुन्हे शाखा कक्ष-४ च्या पथकाने तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील पाशमैलाराम (पठनचेरु) येथील कारखान्यावर छापा टाकला. सायबराबाद पोलिसांच्या मदतीने केलेल्या या कारवाईत मुख्य सूत्रधार रमेश बाबू साके यास ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याच्या कारखान्यातून सुमारे २७ लाख ६ हजार ७४० रुपये किमतीची ४४.६९९ किलोग्राम रासायनिक पावडर आणि प्रयोगशाळेचे (लॅब) साहित्य जप्त करण्यात आले.
तपासात २५ जण जाळ्यात:
या गुन्ह्यात आतापर्यंत एमडी ड्रग्स बनवणारे, त्यासाठी लागणारे केमिकल व लॅब साहित्य पुरवणारे, तशी तस्करी करणारे पेडलर आणि आर्थिक व्यवहार करणारे असे एकूण २५ आरोपींना नालासोपारा, मुंबई, कल्याण, नेरळ, जळगाव, तसेच गुजरात, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतून अटक करण्यात आली आहे.
सदर धडक कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त संजय शिंत्रे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण) नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा कक्ष-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण भोसले, दत्तात्रय सरक, उपनिरीक्षक उमेश भागवत व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी पार पाडली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
