मीरां भाईंदर ( घनश्याम आंबोकर) : महासभेचे कामकाज सुरू असताना सत्ताधारी नगरसेवकांनी नागरिक कक्षात प्रवेश करून मराठी नागरिक आणि पत्रकारांवर केलेल्या कथित मारहाणीप्रकरणी संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी ‘मराठी एकीकरण समिती’च्या वतीने महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आणि नागरिकांवर हात उचलणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.

नेमकी घटना काय? महासभेदरम्यान झालेले मतभेद किंवा राजकीय वाद हे सभागृहाच्या चौकटीत चर्चेच्या माध्यमातून सोडवणे अपेक्षित असताना, थेट नागरिक कक्षात जाऊन नागरिकांशी आणि कर्तव्यावर असलेल्या पत्रकारांशी वाद घालणे तसेच मारहाण करणे हा प्रकार अत्यंत गंभीर आणि लोकशाहीला काळीमा फासणारा असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांचा आवाज बुलंद करणाऱ्या पत्रकारांवर अशा प्रकारे हल्ले होणे खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड इशाराही यावेळी देण्यात आला.

प्रकरणाला राजकीय रंग? दरम्यान, या संपूर्ण घटनाक्रमानंतर आता पत्रकार मारहाण प्रकरणाला राजकीय रंग चढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना या प्रकरणात सक्रिय झाल्या असून, त्यामुळे मूळ मारहाणीच्या आणि सुरक्षेच्या मुद्द्यामागे पडून राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाच अधिक महत्त्व मिळत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांची प्रमुख मागणी: या प्रकरणाची कोणतीही राजनैतिक दडपशाही न ठेवता निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. दोषी व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा पदावर असलीस, तरी तिच्यावर ‘पत्रकार संरक्षण कायद्या’ सह संबंधित कायद्याच्या चौकटीत राहून कठोर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पत्रकार व नागरिकांच्या सुरक्षिततेची प्रशासनाने हमी द्यावी, अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी यावेळी घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *