मुंबई:(संदीप केदारे) – आयआयटी बॉम्बे (IIT Bombay), पवई येथे एका निष्पाप विद्यार्थी साहिल वाकोडे याने कथित जातीय अत्याचारामुळे आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्देवी घटना समोर आली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने आयआयटी बॉम्बे, पवई येथे धडक मोर्चा काढण्यात आला.
- सखोल चौकशीची मागणी: गेल्या ६ ते ८ महिन्यांत कॅम्पसमध्ये झालेल्या आत्महत्येच्या घटनांची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.
- कठोर कारवाईचा बडगा: वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्वतंत्र चौकशी समिती नेमून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
- विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न: बहुजन विद्यार्थ्यांना सातत्याने भेडसावणारे जातीय अत्याचार, दबाव आणि मानसिक त्रासाविरोधात कायदेशीर मार्गाने प्रशासनाला चपराक देण्यासाठी बहुजन चळवळीच्या वतीने हा लढा पुकारण्यात आला आहे.
- प्रशासकीय यंत्रणेला कायदेशीर रित्या जाब विचारत बहुजन चळवळीच्या कार्यकर्त्यांनी व विद्यार्थ्यांनी या प्रकरणी न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.
