(घनश्याम आंबोकर) मीरा-भाईंदर: शहरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या ११ अभ्यासिका (स्टडी सेंटर) उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुण-तरुणींसाठी वरदान ठरत आहेत. प्रशासकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासिका हक्काचे आणि शांततेचे ठिकाण बनल्या आहेत.

सध्या या ११ केंद्रांवर युपीएससी (UPSC), एमपीएससी (MPSC), सीए (CA), एमबीबीएस (MBBS), IIT-JEE, NEET आणि कायद्याचे शिक्षण घेणारे असंख्य विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यास करत आहेत. शहरात उपलब्ध झालेली ही मोफत व सुसज्ज वाचनालयीन सुविधा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.

MPSC मध्ये घवघवीत यश याच अभ्यासिकांमध्ये निरंतर अभ्यास करून यावर्षी मीरा-भाईंदरमधील अनेक विद्यार्थी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले असून, महाराष्ट्र शासनात अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. पालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाला नवी दिशा मिळाली असून, संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण आहे.

सुविधा वाढवण्याची मागणी स्थानिक पातळीवर शैक्षणिक वातावरण अधिक बळकट करण्यासाठी ‘माणुसकी फाऊंडेशन’ने पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत. तसेच या ११ अभ्यासिकांमध्ये वातानुकूलित यंत्रणा (AC), हाय-स्पीड वाय-फाय (Wi-Fi) आणि स्पर्धा परीक्षांची अद्ययावत पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी केली आहे. याशिवाय, शहराच्या प्रत्येक प्रभागात नवीन अभ्यासिका सुरू करण्याची अपेक्षा फाऊंडेशनतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य शहरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकांचा लाभ घेऊन शासकीय सेवा आणि उच्च पदांवर झेप घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अभ्यासासाठी पोषक ठरणाऱ्या या सुविधांमुळे आगामी काळात मीरा-भाईंदरमधून देशाचे नेतृत्व करणारे सक्षम तरुण घडतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *