
मीरारोड -विरार (घनश्याम आंबोकर) : विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम आणि सायबर गुन्हेगारीबाबत वाढत्या धोक्यांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी मीरा-भयंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातर्फे १३ ऑगस्ट रोजी एका भव्य ऑनलाइन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विशेष उपक्रमात आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या शंभरहून अधिक शाळांमधील २१ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक युगात शाळकरी वयातील मुलांमध्ये सायबर गुन्हेगारीचे प्रमाण आणि व्यसनाधीनतेचा विळखा टाळण्यासाठी त्यांना वेळीच योग्य खबरदारी घेण्याचे महत्त्व पटवून देणे, हा यामागचा मुख्य उद्देश होता.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद, रितेश देशमुख, मुकेश ऋषी आणि राजा मुराद यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विशेष व्हिडिओ संदेश यावेळी दाखवण्यात आले. या सेलिब्रिटींनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून उज्ज्वल भविष्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.तसेच, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिरे आणि सायबर तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेचे धडे देत ऑनलाइन फसवणुकीपासून कसे वाचावे, याचे तांत्रिक व कायदेशीर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात व्यसनाधीनतेच्या अंधकारातून बाहेर पडून सामान्य जीवन जगणारे अक्षय सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसोबत आपला जीवनप्रवास आणि अनुभव शेअर केला. त्यांच्या या मनोगताने विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर विशेष प्रभाव पाडला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना व्यसनांपासून दूर राहण्याची सामूहिक शपथ देण्यात आली. राष्ट्रगीताने या प्रभावी आणि प्रेरणादायी कार्यक्रमाची सांगता झाली.
