नवी दिल्ली / मुंबई (अनिल वाघेला ): अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गोविंदभाई परमार यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आज (दि. १४) नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे (भारत सरकार) उपाध्यक्ष माननीय श्री. हरदीपसिंह गिल यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी युनियनच्या वतीने त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या महत्त्वपूर्ण बैठकीत महाराष्ट्र राज्य आणि विशेषतः मुंबईतील सफाई कामगारांच्या प्रलंबित व जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कायदेशीर चौकटीत राहून कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने खालील प्रमुख मुद्यांवर शिष्टमंडळाने आयोगाचे लक्ष वेधले:
- जातीचा दाखला (कास्ट सर्टिफिकेट): सफाई कामगारांच्या वारसदारांना आणि मुलांना कायदेशीर प्रक्रियेनुसार विनाअडथळा जातीचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढणे.
- कामगारांचे सेवाविषयक प्रश्न: सफाई कर्मचाऱ्यांच्या सेवेतील सुरक्षितता, आरोग्य आणि हक्कांच्या लाभांची प्रभावी अंमलबजावणी करणे.
- मालकी हक्काची घरे: मुंबईतील सफाई कामगारांना हक्काची आणि कायदेशीर मालकीची घरे उपलब्ध करून देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे.
- कंत्राटी पद्धतीस विरोध: माननीय उच्च न्यायालयाच्या आदेश व नियमावलीनुसार, सफाई व आरोग्य विभागात कोणतीही कंत्राटी (ठेकेदारी) पद्धत राबवण्यात येऊ नये, यावर भर देण्यात आला.
यावेळी दिल्ली प्रदेश सेक्रेटरी श्री. राजेश बेदी, कामगार नेते श्री. सुनील टीवेटिया यांच्यासह युनियनचे इतर सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय उपाध्यक्षांनी कामगारांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या असून, कायदेशीर चौकटीत राहून या प्रश्नांवर योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.सफाई कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि हितासाठी युनियनच्या वतीने हा लढा सातत्याने सुरू ठेवण्यात येईल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.



