वसई: वसई पश्चिम येथील आनंद नगर भागात, स्टेशनलगत भरलेल्या ‘रक्षाबंधन विशेष प्रदर्शनाला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘आर्ट कॉर्नर अकादमी’तर्फे आयोजित या प्रदर्शनात कलाकारांच्या हाताने साकारलेल्या राख्या, रेझिन क्राफ्ट आणि विविध हस्तकलेच्या वस्तू पाहून नागरिक थक्क होत आहेत.७ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाचे आयोजन अकादमीच्या विभावरी देसाई यांनी केले असून, विद्यार्थिनी स्वरा शेट्ये आणि यश्मित अमीन यांनी या उपक्रमासाठी मेहनत घेतली आहे. प्रदर्शनात राख्यांसह सुगंधी मेणबत्त्या, शोभेच्या वस्तू आणि सुंदर पेंटिंग्स मांडण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी भेट दिली. यात आयझॅक न्यूटन शाळेच्या मुख्याध्यापिका सोफिया डाबरे, फॅशन डिझायनर स्नेहा गोरे, डॉ. वरुण शिरीषकर, ॲड. रुचिता सामंत यांच्यासह पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कलाकारांचे मनोबल उंचावले. कलाकारांना हक्काची बाजारपेठ मिळावी आणि त्यांच्या कलेचा सन्मान व्हावा, हा प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे. उद्या ९ ऑगस्ट रोजी हे प्रदर्शन समारोपाकडे झुकणार असून, कलाप्रेमींनी या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




















