Oplus_131072

– युवक काँग्रेसचे रवींद्र खरात यांच्या तक्रारीनंतर राज्यस्तरीय समितीच्या अहवालातून धक्कादायक बाबी उघड

मीरा-भाईंदर (घनश्याम आंबोकर) : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्राणी जन्म नियंत्रण (Animal Birth Control – ABC) केंद्राच्या कारभारातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. केंद्राचा ठेका घेतलेल्या मे. प्रतापराव राणे सामाजिक शैक्षणिक ट्रस्टच्या कामकाजात गंभीर अनियमितता असल्याचे राज्यस्तरीय तज्ज्ञ समितीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. युवक काँग्रेसचे रवींद्र बाबासाहेब खरात यांनी केलेल्या तक्रारीनंतर २२ जुलै २०२५ रोजी करण्यात आलेल्या प्रत्यक्ष पाहणीत नोंदींमधील विसंगती आणि प्रशासकीय हलगर्जीपणा समोर आल्याने, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी संस्था व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.युवक काँग्रेसच्या तक्रारीची दखल घेत गठित करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने केंद्रातील औषध साठा, ऑपरेशन थिएटर, कर्मचारी उपस्थिती आणि प्राण्यांच्या देखभालीची सखोल तपासणी केली. अहवालातील मुद्दे क्रमांक ११, १३, १४, १५ आणि १७ मधील निष्कर्ष अत्यंत चिंताजनक आहेत:

  • विलगीकरण कक्षाचा अभाव: केंद्रात संसर्गजन्य आजार असलेल्या प्राण्यांसाठी स्वतंत्र विलगीकरण वॉर्ड (Isolation/Quarantine) अस्तित्वातच नसल्याचे तपासणीत आढळले. नियमानुसार ही अनिवार्य सुविधा नसल्याने इतर प्राण्यांच्या आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.
  • औषध साठ्यात तफावत: औषध साठ्याची नोंदवही नियमांनुसार ठेवण्यात आलेली नव्हती. प्रत्यक्ष उपलब्ध औषधसाठा आणि नोंदवहीतील आकडेवारी यात मोठी तफावत असून नोंदी अस्पष्ट आहेत.
  • नोंदवहीत अनागोंदी: कुत्रे पकडल्याची व सोडल्याची (डॉग कॅच व रिलीज रजिस्टर) माहिती एकमेकांशी जुळत नाही. संबंधित नोंदींवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्याही नसल्याने निर्बिजीकरणाच्या वास्तविक आकडेवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
  • ऑपरेशन रजिस्टरमधील विसंगती: मांजरांच्या निर्बिजीकरणासह ऑपरेशन रजिस्टर अत्यंत चुकीच्या पद्धतीने राखण्यात आले असून, प्राण्यांची पडताळणी करणे प्रशासनाला अशक्य झाले आहे.

सर्व त्रुटी दूर होईपर्यंत संबंधित ABC केंद्राचे काम तात्पुरते स्थगित (Suspend) करण्याची महत्त्वाची शिफारस समितीने केली आहे. तसेच नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, औषध साठ्याची अचूक नोंद ठेवणे आणि नियमांनुसार निरीक्षण समितीची पुनर्रचना करण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करताना रवींद्र बाबासाहेब खरात म्हणाले,

“माझ्या तक्रारीतील मुद्दे समितीच्या तपासणीत सत्य ठरले आहेत. मुक्या प्राण्यांच्या आरोग्याशी अशा प्रकारे खेळणे अत्यंत धक्कादायक आहे. मे. प्रतापराव राणे सामाजिक शैक्षणिक ट्रस्ट, संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी आणि या गैरव्यवहाराला जबाबदार असलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी.”

पालिकेने हा सविस्तर अहवाल तातडीने सार्वजनिक करावा, दोषींवर शिस्तभंगाची आणि कायदेशीर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी नियंत्रण यंत्रणा उभारावी, अशी आक्रमक मागणी खरात यांनी केली आहे.

DOC-20260806-WA0010. Download 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed