Oplus_131072

घनश्याम आंबोकर , मीरा – भायंदर

Oplus_131072

​मिरा-भायंदर महानगरपालिकेकडून सार्वजनिक निधीतून करण्यात येणाऱ्या सर्व विकासकामांच्या ठिकाणी कामाचा संपूर्ण तपशील दर्शवणारे माहिती फलक लावण्यात यावेत, अशी मागणी ‘माणुसकी फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेने पालिकेकडे केली आहे. यामुळे सार्वजनिक निधीच्या वापरात पारदर्शकता येऊन नागरिकांना योग्य माहिती मिळेल, असा दावा संस्थेने केला आहे.

​महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात गार्डन, ओपन जिम, उद्यान, रस्ते, पदपथ आणि इमारतींची बांधकामे यांसारखी विविध विकासकामे हाती घेतली जातात. मात्र, या कामांवर होणारा खर्च आणि कामांचा दर्जा याबाबत सर्वसामान्यांना पुरेशी माहिती उपलब्ध नसते. या पार्श्वभूमीवर, माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष घनश्याम आंबेाकर यांनी मिरा-भायंदर पालिकेच्या आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.

कायदेशीर व प्रशासकीय पारदर्शकता

माहितीच्या अधिकाराच्या तत्त्वांशी सुसंगत राहून कारभारात उत्तरदायित्व आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी प्रशासनाने अशा प्रकारचे माहिती फलक लावणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

फलकावर कोणत्या माहितीची अपेक्षा?

​संस्थेने दिलेल्या निवेदनानुसार, विकासकामांच्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या फलकावर पुढील माहिती असणे आवश्यक आहे:

  • कामाचे नाव व तपशील
  • मंजूर अंदाजित खर्च आणि झालेला अंतिम खर्च
  • निधीचा मूळ स्रोत
  • कंत्राटदाराचे नाव व संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्याचे नाव
  • काम सुरू झाल्याची आणि पूर्ण झाल्याची तारीख

​सार्वजनिक निधीचा वापर कसा होतो हे जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना असून, पालिकेने तात्काळ या संदर्भात आवश्यक आदेश काढून विद्यमान व भविष्यातील सर्व विकासकामांच्या ठिकाणी कायमस्वरूपी माहिती फलक लावावेत, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed