घनश्याम आंबोकार वृत्तसेवा, मीरा रोड:
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मीरा-भाईंदर युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी शहरात भव्य वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा आणि मीरा-भाईंदर महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन यांच्या पुढाकारातून या पर्यावरणपूरक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मीरा रोड येथील आला हजरत मैदान परिसरात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, हरित विकास आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या मोहिमेला युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
”राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ दिखाऊ कार्यक्रम न करता, समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची आमची परंपरा आहे. वृक्षारोपणासारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक संदेश देण्याचा आणि शहराचे हरित कवच वाढवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.”
– सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन (उपाध्यक्षा, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस)
या प्रसंगी उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत जास्तीत जास्त झाडे लावण्याचे व ती जगवण्याचे आवाहन करण्यात आले. ‘झाडे लावा, पर्यावरण वाचवा – हिरवे शहर, सुंदर शहर’ अशा घोषणा देत सहभागी नागरिकांनी पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
