प्रतिनिधी, पुणे:

​छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) २०२२-२३ च्या तुकडीतील पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिपबाबत निर्माण झालेला पेच तातडीने सोडवावा आणि कोणावरही अन्यायकारक कारवाई करू नये, अशी मागणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने (आठवले गट) केली आहे. या संदर्भात परिषदेच्या वतीने ‘सारथी’च्या निबंधक स्नेहल पाटील-भोसले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

​’सारथी’ संस्थेने अलीकडेच सुमारे २५० ते ३०० संशोधक विद्यार्थ्यांना लेखी पत्रव्यवहार करून त्यांच्या फेलोशिप आणि नोकरी संदर्भात खुलासे मागवले आहेत. या प्रशासकीय कारवाईमुळे विद्यार्थी मोठ्या मानसिक तणावाखाली असून, त्यांच्या भविष्याबाबत टांगती तलवार निर्माण झाली आहे.

सहानुभूतीपूर्वक निर्णयाची मागणी

​विद्यार्थी परिषदेचे शहराध्यक्ष सुरज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (२४ मार्च) ‘सारथी’ कार्यालयात शिष्टमंडळाने भेट दिली. “ज्या विद्यार्थ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करू नये. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक मार्ग काढावा,” अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

‘हक्कासाठी शेवटपर्यंत लढू’

​यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सुरज गायकवाड म्हणाले की, “संशोधक विद्यार्थ्यांची हक्काची फेलोशिप कोणालाही हिरावून घेऊ दिली जाणार नाही. या लढ्यात आम्ही शेवटपर्यंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहू.”

​यावेळी राहुल ससाणे यांच्यासह ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’ या दोन्ही संस्थांचे अनेक संशोधक विद्यार्थी आणि विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निबंधक स्नेहल पाटील-भोसले यांनी निवेदन स्वीकारले असून, या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *