प्रतिनिधी, मुंबई:
भारताच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणि सम्राट अशोकांचे धम्मकार्याप्रती असलेले योगदान अधोरेखित करण्यासाठी ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ने (भारतीय बौद्ध महासभा) एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे प्रत्येक बौद्ध विधी संस्कारात आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत चक्रवर्ती सम्राट अशोक यांची प्रतिमा अथवा मूर्ती ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या या शिखर संस्थेच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीची बैठक नुकतीच दादर येथील ‘आंबेडकर भवन’मध्ये पार पडली. या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी मांडलेल्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
२६ मार्चपासून देशभर जयंती साजरी होणार
या निर्णयासोबतच, यंदापासून प्रतिवर्षी २६ मार्च रोजी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती संपूर्ण देशभर उत्साहात साजरी करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे. २६ मार्च २०२६ रोजी सम्राट अशोकांची २३३० वी जयंती असून, या दिवसापासून या नव्या निर्णयाची अंमलबजावणी देशभरात सुरू होणार आहे.
निर्णयामागची भूमिका
सम्राट अशोकांनी ८४ हजार स्तुपांची निर्मिती केली, अनेक देशांत धम्मप्रसार केला आणि भारतीय उपखंडाला सुवर्णकाळ मिळवून दिला. हा ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
”चक्रवर्ती सम्राट अशोकांचे धम्मकार्यातील योगदान अमूल्य आहे. त्यामुळेच भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबतच सम्राट अशोकांचे स्मरण व वंदन करणे ही काळाची गरज आहे.”
— संस्था पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभा
अंमलबजावणीचे आवाहन
संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉ. हरीश रावलिया, रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन अॅड. सुभाष जांजळे आणि ट्रस्टी अॅड. एस. के. भंडारे यांच्या स्वाक्षरीने हे अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे. भारतातील सर्व राज्य, जिल्हा, तालुका, शहर आणि प्रभाग स्तरावरील शाखा, बौद्धचार्य तसेच आंबेडकरवादी समाजाने या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
