सुनावणीपूर्वी दबाव टाकल्याची तक्रार; कामगार उपआयुक्तांकडे धाव

वसई : Universal College of Engineering येथे कार्यरत असलेल्या हाऊसकिपींग कर्मचाऱ्यांना कामावरून रोखण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. कामगार उपआयुक्त, पालघर कार्यालयात २५ तारखेला होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याची तक्रार संबंधित कर्मचाऱ्यांनी केली आहे.

कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ते अनेक वर्षांपासून कॉलेजमध्ये कार्यरत असून अलीकडेच ते युवाशक्ती कामगार संघटनेचे सभासद झाले आहेत. त्यानंतर प्रकरणाची सुनावणी कामगार उपआयुक्त कार्यालयात निश्चित झाली. मात्र सुनावणीपूर्वीच काही कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यास मज्जाव करण्यात आला असून कॉलेज परिसरात प्रवेश देण्यासही मनाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

“स्वाक्षरी करा, अन्यथा काम दिले जाणार नाही,” अशा स्वरूपाचा दबाव टाकण्यात आल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच अनेक वर्षे सेवा करूनही किमान वेतन, ईएसआय, पीएफ यांसारख्या वैधानिक सुविधांबाबत त्रुटी असल्याची तक्रार त्यांनी केली. भविष्यात खोटे आरोप लावून कारवाई केली जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्यांनी कामगार उपआयुक्त तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. “आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून न्यायासाठी लढा देणार आहोत. मात्र न्याय न मिळाल्यास आंदोलन किंवा उपोषणाचा मार्ग स्वीकारू,” असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

या संदर्भात कॉलेज प्रशासनाची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. येत्या सुनावणीत या प्रकरणाला कोणते वळण लागते, याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *