अमित राठोड यांनी सर केलं १५,७०० फूट उंच शितिधार शिखर – युवकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ

रुबीना मुल्ला | वसई प्रतिनिधी

आजच्या धावपळीच्या, मोबाईल आणि सोशल मीडियात गुंतलेल्या युगात, एक वसईकर युवक प्रत्यक्ष हिमालयात जाऊन १५,७०० फूट उंचावर चढाई करतो आणि शितिधारसारखे कठीण शिखर सर करतो – हे केवळ साहस नाही, ही एक सामाजिक प्रेरणा आहे.

अमित सिताराम राठोड, वसईचा युवक, याने हिमाचल प्रदेशातील अटल बिहारी वाजपेयी माउंटेनियरिंग अँड अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (ABVIMAS) येथे भारत सरकार मान्य बेसिक माउंटेनियरिंग कोर्स (BMC) यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यानंतर त्याने पिर पंजाल पर्वतश्रेणीतील शितिधार शिखर सर करत वसईचं नाव थेट हिमालयात उजळवलं.

शारीरिक-मानसिक क्षमतेची परीक्षा

मनालीपासून सुरू झालेली ही चढाई सोलांग नाला, बकरथाच बेस कॅम्प आणि अखेर थरारक बर्फाळ शिखरापर्यंत होती. बर्फ, खडतर हवामान, जीवावर बेतणाऱ्या अडचणी आणि तरीही जिद्दीने शिखर सर करणं — ही तरुणांच्या “मी काहीही करू शकतो” या आत्मविश्वासाची प्रचिती आहे.

अमितचे स्वप्न – “भारताचा तिरंगा एव्हरेस्टवर”

अमित केवळ आपली शारीरिक क्षमता सिद्ध करत नाही, तर तो एक सामाजिक संदेशही देतो — “स्वप्न पहा, संघर्ष करा आणि समाजासाठी स्फूर्ती बना.”
त्याचं पुढचं ध्येय आहे — कंचनजंगा व एव्हरेस्ट सर करून भारताचा तिरंगा सर्वोच्च शिखरांवर फडकवणं.

अमित म्हणतो –

“हिमालयातील अनुभवाने मला आत्मविश्वास आणि संयम शिकवला. माझं पुढचं स्वप्न एव्हरेस्ट सर करण्याचं आहे.”


समाजाला साद –

वसईतील पालक, शिक्षक, सामाजिक संस्था, राजकीय नेते आणि युवक संघटनांनी अशा प्रेरणादायी व्यक्तींचं स्वागत, सन्मान आणि प्रोत्साहन केलं पाहिजे.
यातून नव्या पिढीला व्यसनमुक्त, मोबाईलपासून मुक्त, आणि कर्तृत्ववान जीवनाकडे वळण्याची दिशा मिळू शकते.


ही केवळ एक बातमी नाही – ही एक क्रांती आहे!

एक वसईकर हिमालय सर करतोय, तर बाकी वसईकर त्याच्याकडून नवे शिखर सर करण्याची प्रेरणा घ्यावी!



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *