मीरा-भाईंदर (घनश्याम आंबोकर ):
स्वतःच्या मालकीची ६ एकर १५ गुंठे जमीन अतिक्रमणमुक्त करण्यासाठी राजस्थानच्या महाराणी सोहन कंवर यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. न्यायालयात कायदेशीर लढा जिंकून मालकी हक्क सिद्ध केल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने त्यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा ठाकला आहे.
जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासाठी सोहन कंवर यांनी मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि स्थानिक पोलिसांकडे वारंवार लेखी पाठपुरावा केला आहे. मात्र, प्रशासकीय यंत्रणेकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. न्यायालयाचा निकाल बाजूने लागूनही पालिका अतिक्रमण हटवण्यास टाळाटाळ करत असल्याने या वृद्ध महिलेला नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
न्याय मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या सोहन कंवर यांच्या समस्येची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी आणि लवकरात लवकर जमीन अतिक्रमणमुक्त करून न्याय द्यावा, अशी तीव्र मागणी जोर धरत आहे.
