विरार (प्रतिनिधी): समाजातील उपेक्षित घटकांसाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या ‘माणुसकी फाउंडेशन’च्या कार्याची दखल घेत विरार येथील ‘राम-जानकी हेल्थकेअर सेंटर’ येथे ‘अविण्य फाउंडेशन’च्या वतीने एका विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात माणुसकी फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा रजनीताई गडा आणि कार्याध्यक्ष ॲड. किरण म्हात्रे यांच्यासह १५ कर्तृत्ववान महिलांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘नारी गौरव’चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
महिला सक्षमीकरण, गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजात जनजागृती घडवून आणणाऱ्या महिलांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. अविण्य फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात फाउंडेशनचे अध्यक्ष घनश्याम आंबोकर यांनी सर्व सन्मानित महिलांचे अभिनंदन करताना त्यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमात बोलताना अविण्य फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “माणुसकी फाउंडेशनच्या माध्यमातून रजनीताई गडा आणि ॲड. किरण म्हात्रे ज्या निष्ठेने आणि आत्मियतेने समाजसेवा करत आहेत, ती आजच्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या या लोकोपयोगी कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”
या कार्यक्रमास राम-जानकी हेल्थकेअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी, अविण्य फाउंडेशनचे डॉ. सुशील सावंत, समृद्धी संस्थेचे संस्थापक सुभाष जाधव, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत नागरे, माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष घनश्याम आंबोकर, सचिव राजेश जाधव यांच्यासह अनेक मान्यवर आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू परब यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संजय बाळकृष्ण धामणे यांनी मानले.
सन्मानित महिलांची नावे: प्रीती जाधव, योजना गुरव, रुचिता नाईक, अमिता शिंदे, स्मिता कंडार, कीर्ती पंडित, प्रीती पालकर, कीर्ती शेंडे, ॲड. किरण म्हात्रे, किशोरी पाटील, वृंदा दिवेकर, रजनी गडा, प्रगती आचरेकर, प्रांजल नारकर आणि सौ. कोकरे.
